जळगाव -जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार अल्पवयीन भावंडांच्या हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी महेंद्र सीताराम बारेला (वय 19) याने भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. न्यायालय 18 जून रोजी त्यावर निर्णय देणार आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हेही वाचा -देशात गेल्या २४ तासांमध्ये ९१ हजार कोरोना रुग्णांची नोंद; ३,४०० जणांचा मृत्यू
उज्ज्वल निकम यांनी मांडली बाजू-
या खटल्यात राज्य सरकारने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. ऍड. निकम यांनी सुनावणीत सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. या हत्याकांडाचा पोलिसांनी केलेला तपास, परिस्थितीजन्य पुरावे तसेच आरोपीने वडिलांकडे दिलेली गुन्ह्याची कबुली याबाबत ऍड. निकम यांनी सुनावणीत मुद्दे मांडले. न्यायालय आरोपीच्या जामीन अर्जावर 18 जून रोजी निकाल देणार आहे.
काय आहे प्रकरण?
रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारातील मुश्ताक शेख यांच्या शेतात 16 ऑक्टोबर 2020 रोजी चार अल्पवयीन भावंडांची कुऱ्हाडीने वार करत निर्घृणपणे हत्या झाली होती. यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचेही समोर आले होते. हत्या झालेली मुले ही मुश्ताक शेख यांच्याकडे कामाला असलेल्या मजूर कुटुंबातील होती. या गुन्ह्यात शेतमालक शेख यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.