जळगाव- साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णनगरी असलेल्या जळगावातील सराफा बाजारपेठेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. अनेकांनी हा मुहूर्त साधत परंपरा जपली आहे.
सुवर्णनगरी जळगावात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी केलेले सोने हे कायमस्वरूपी अक्षय असते, त्यामुळे संसारात लाभ होतो, असा समज आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले जात असल्याने सराफ बाजारातील विविध सुवर्णपेढ्यांवर सवलतींचा वर्षाव करण्यात आला होता.
काही दुकानांमध्ये दागिन्यांच्या खरेदीवर खास सूट देण्यात आली आहे तर, काही सुवर्णपेढ्यांवर दागिन्यांच्या घडवणीवर सूट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या परीने शक्य तितक्या सोन्याची खरेदी करताना दिसून आला.
दुष्काळी परिस्थितीचा परिणाम नाही-
मंगळवारी जळगावात सोन्याचा दर ३२ हजार १०० रुपये प्रतितोळा होता. अनेक ग्राहकांनी सोन्याची नाणी, अंगठी तसेच दागिन्यांची खरेदी केली. यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना त्याचा फटका सुवर्ण बाजाराला बसलेला नसल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी प्रत्येकजण थोडे तरी सोने खरेदी करतो. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असताना सराफ बाजारावर त्याचा फारसा फरक पडला नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.