जळगाव- जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमळनेरमध्ये तर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात अमळनेर शहरातील 31 व्यक्तींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्या शंभरावर गेली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 157 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात शनिवारी आणखी 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 103 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. यापैकी 71 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये चोपडा तालुक्यातील अडावद येथील एक, अमळनेर येथील 31 असा एकूण 32 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 157 इतकी झाली असून त्यापैकी 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.