जळगाव -अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे चार लाख हेक्टरवरील पिके वाया गेली असून, शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका कापूस पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने अक्षरशः मातीमोल झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनचे आगमन झाल्याने पेरण्या लवकर झाल्या. मात्र, त्यानंतर अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जुलै ते ऑगस्टमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर पावसाने वार्षिक सरासरी भरून काढत चांगलाच दणका दिला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असून, खरीप हंगाम पूर्णपणे पाण्यात गेला आहे.
५ लाख शेतकऱ्यांना बसला फटका
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरीस जोरदार पाऊस झाला. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अमळनेर तसेच जामनेर तालुक्यासह इतर ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. या नुकसानीची प्राथमिक माहिती कृषी विभागाने मिळवली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील १ हजार ४३७ गावांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. ४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण साडेसात लाख हेक्टरपैकी ३ लाख ७१ हजार २५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्याची आकडेवारी कृषी विभागाने जाहीर केली आहे. नुकसानीचा आकडा हा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.