जळगाव - अवकाळी पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. एकूण 15 तालुक्यातील 1 हजार 468 गावांमधील जवळपास 5 लाख 99 हजार 830 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक कापसाचे नुकसान झाल्याने जवळपास 5 लाख 5 हजार 877 शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पिकांचे नुकसान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात झाले. या तालुक्यात 85 हजार 166 हजार हेक्टर क्षेत्र पाऊस बाधित आहे.
खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाचे पीक या अवकाळी पावसामुळे हातून गेले असून, 3 लाख 17 हजार 893 हेक्टर क्षेत्रावरील कापसाच्या पिकाला पावसाचा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे ज्वारी - 38 हजार 288 हेक्टर, बाजरी - 8 हजार 769 हेक्टर, मका - 77 हजार 356 हेक्टर, सोयाबीन - 17 हजार 101 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केला आहे.
गिरणा धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग
पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने शनिवारी(दि.2नोव्हेंबर) सकाळी साडेसहाच्या दरम्यान गिरणा धरणातून 52 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसामुळे गिरणा धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ होत असून, नदीत गिरणा, मन्याड व इतर नद्या-नाले असे एकूण 70 हजार क्युसेक पाणी जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.