जळगाव - येथील उपकारागृहातील एका कर्मचाऱ्यावर पॅरोलवर बाहेर असलेल्या गुन्हेगाराने प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उपकारागृहाबाहेर घडली. हल्ला झाला त्यावेळी संबंधित कर्मचारी हा उपकारागृहाबाहेर रात्रीचा पहारा देत होता. कारागृहात असताना सुट, सुविधा दिली नसल्याच्या रागातून हा हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. राज वसंत चव्हाण (रा. अमळनेर) असे हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पॅरोलवरील गुन्हेगाराचा जळगाव उपकारागृहातील कर्मचाऱ्यावर हल्ला
कारागृहात असताना सुट, सुविधा दिली नसल्याच्या रागातून पॅरोलवरील गुन्हेगाराने जळगाव उपकारागृहातील कर्मचाऱ्यावर हल्ला केला.
राज चव्हाण याने कारागृह कर्मचारी कुलदीपक सुंदर दराडे (वय २६, रा. शासकीय निवासस्थान सबजेल, जळगाव) यांच्यावर हल्ला केला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून कारागृहातील कैद्यांना ४५ दिवसांच्या पॅरोलवर सोडले जात आहे. त्यानुसार चव्हाण हा देखील सध्या पॅरोलवर आहे. कुलदीपक दराडे हे ३ जून रोजी रात्रपाळीत कारागृहाच्या बाहेर पहारा देत होते. त्यांच्यासोबत प्रकाश मालवे, सचिन कोरके, अरविंद पाटील हे देखील कर्तव्यावर होते. रात्री ९.३० वाजता अचानकपणे राज चव्हाण हा हातात चॉपर घेऊन कारागृहाच्या बाहेर पोहोचला. त्याने दराडे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मारहाणही करण्यास सुरूवात केली. चव्हाण याने चॉपरचा धाकही दाखवला. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. रोशन गिरी, अरविंद म्हस्के, राहुल बोडके हे कर्मचारी दराडे यांच्या मदतीला धावून आल्याने अनर्थ टळला.
अंधाराचा फायदा घेत चव्हाण पळून गेला. या घटनेनंतर गुरुवारी कुलदीपक दराडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जाऊन चव्हाण याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उपकारागृहात सातत्याने काही तरी वादाचे प्रकार घडत असतात. याठिकाणी कच्च्या कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असून, त्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याने अशा घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.