जळगाव -सद्यस्थितीत आपण आधुनिक काळात वाटचाल करत आहोत. काळ बदलला मात्र काही ठिकाणी आजही जात, पात, धर्मभेद पाळले जात असल्याची शोकांतिका आहे. ग्रामीण भागात आजही आंतरजातीय विवाहाला मान्यता नसल्याचे चित्र आहे. अशाप्रकारे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पारोळा (Parola) तालुक्यातील एका गावात आंतरजातीय विवाह (Inter Caste Marriage) केला म्हणून विवाह करणार्या मुलीसह तरुणावर गाव सोडण्याची वेळ आली आहे.
- काय आहे प्रकरण?
पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथे आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलगी तसेच मुलाच्या कुटुंबियांना मुलीच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून मारहाण करत छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आहे. दोघेही सज्ञान आहेत. १५ ऑगस्टला दोघांनी आंतरजातीय विवाह केल्यानंतर पारोळा पोलिसात हजर झाले. याठिकाणी पोलिसांनी मुलगा व मुलगी दोघांकडील आई वडीलांना बोलावले. मुलगी सज्ञान असल्याने तिने पतीसोबत राहण्याचे सांगितल्यावर कायदेशीररित्या नोंदही करण्यात आली. मात्र, आता मुलगी परत द्या म्हणत मुलीचे वडील तसेच नातेवाईक तरुणाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करत छळ करत आहेत असा आरोप तरुणाकडून केला जात आहे. याबाबत पारोळा पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तरुणाने केला आहे. कारवाईच्या मागणीसाठी दाम्पत्याने पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे.