महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीसीआयची कापूस खरेदी जोरात; शेतकऱ्यांना मिळतोय साडेपाच हजारापर्यंतचा भाव

जिल्ह्यात मागील पंधरवड्यात सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर कापसाची प्रतवारी तपासली जाते असून ८ ते १२ टक्के मॉइश्चर असलेल्या कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ४०० ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे.

jal
सीसीआयची कापूस खरेदी जोरात

By

Published : Dec 11, 2019, 10:37 AM IST

जळगाव -जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी जोरात सुरू आहे. सीसीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवर दररोज हजारो क्विंटल कापूस येत आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे शेतकऱ्यांसमोर सीसीआयचा पर्याय उपलब्ध आहे. सीसीआयकडून कापसाची प्रतवारी तपासून प्रतिक्विंटल ५ हजार ४०० ते साडेपाच हजार रुपये भाव दिला जात आहे. तर, हाच माल खासगी व्यापारी ४ हजार ८०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल भावात खरेदी करत आहेत. दरम्यान, सीसीआयच्या निकषात न बसलेला माल शेतकऱ्यांना नाइलाजाने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.

कापसाची प्रतवारी तपासणी

जळगाव जिल्ह्यात मागील पंधरवड्यात सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यावर्षी सीसीआयची केंद्रं उशिरा सुरू झाली. मात्र, खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना अडवणुकीचे धोरण अवलंबत असल्याने शेतकरी सीसीआयकडे वळत आहेत. सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापसाची प्रतवारी तपासली जाते. ८ ते १२ टक्के मॉइश्चर असलेल्या कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ४०० ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे जिरायती तसेच बागायती कापूस पिकाला देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला.

सीसीआयची कापूस खरेदी जोरात

सुरुवातीला निघालेला माल ओलसर आणि खराब असल्याने खासगी व्यापारी कवडीमोल भावात कापूस खरेदी करत होते. मालाची प्रतवारी पाहून सीसीआयने देखील सावध भूमिका घेत कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाहीत. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यातील माल चांगला निघत असल्याने शेतकऱ्यांना सीसीआयकडून चांगला दर मिळत आहे. ८ ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त मॉइश्चर असलेला माल मात्र, शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागत आहे.

आधारकार्ड, बँकेचे पासबुक तसेच कापसाचा पेरा असलेला सातबारा उतारा अशा कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळत आहेत. खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत सीसीआयकडून ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव जास्त मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. काही शेतकऱ्यांच्या मात्र, सीसीआयकडून होणाऱ्या कापसाच्या प्रतवारी तपासणीसंदर्भात तक्रारी आहेत. थंडीमुळे पडणारे दव तसेच हवामानातील बदलामुळे कापसाचा ओलसरपणा वाढत आहे. अशा परिस्थिती सीसीआयने निकष शिथिल केले पाहिजेत, अशी काही शेतकऱ्यांची मागणी आहे.

हेही वाचा -जळगावात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, रिक्षाचालक बचावला

मध्यप्रदेश तसेच गुजरातमध्ये कोरडवाहू क्षेत्रातील कापसाची वेचणी सुरू झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातील व्यापाऱ्यांकडून खान्देशात कापसाची खेडा खरेदी (गावागावात जाऊन होणारी खरेदी) कमी प्रमाणात होत आहे. सध्या किरकोळ व्यापारी तसेच जिनिंग व प्रेसिंग कारखानदारांकडून कापसाची खेडा खरेदी सुरू आहे. तसेच त्यांच्याकडून कापसाला प्रतिक्विंटल ४ हजार ८०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे. दरम्यान, सीसीआयकडून चांगल्या दर्जाच्या कापसाला साडेपाच हजारापर्यंतचा भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना माल देण्यास तयार नाहीत. त्यातच खासगी व्यापारी प्रतवारीचे कारण पुढे करत शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याने, हीच बाब सीसीआयच्या पथ्थ्यावर पडली आहे.

काही ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक
जिल्ह्यातील काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. सीसीआयच्या केंद्रांवर प्रतवारीचे कारण पुढे करत निकषात न बसलेल्या मालाची खरेदी होत नाही. हा माल खासगी व्यापारी साडेचार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल भावात शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. तोच माल खासगी व्यापारी सीसीआयला जास्त भावात विकत असल्याच्या तक्रारी आहेत. या सारख्या प्रकारांची चौकशी व्हावी, अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु, सीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून अशा स्वरूपाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा -रजेवर असलेल्या शाळेच्या शिपायाने चोरल्या १७ दुचाकी; जळगाव शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ABOUT THE AUTHOR

...view details