जळगाव- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र, सीसीआय व पणन महासंघाला अद्याप आदेश नसल्याने कापूस खरेदीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कापूस उत्पादक शेतकरी कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पणन महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कापूस खरेदीस परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती पणन महासंघाचे नाशिक विभागाचे संचालक संजय पवार यांनी दिली आहे.
सीसीआय, पणन महासंघाला कापूस खरेदीचे आदेश नाहीत; हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कापूस खरेदीवर बंदी आणली होती. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यासंदर्भात आदेश काढत सीसीआयमार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासाठी विविध अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असले तरी सीसीआय मात्र खरेदी करण्याच्या तयारीत नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कापूस खरेदीवर बंदी आणली होती. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यासंदर्भात आदेश काढत सीसीआयमार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासाठी विविध अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असले तरी सीसीआय मात्र खरेदी करण्याच्या तयारीत नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश अद्याप मिळाले नसल्याचे सांगत सीसीआयने कापूस खरेदी अद्याप सुरू होणार नाही, असे म्हटले आहे. पणन महासंघाने देखील शासनाकडून आदेश मिळाल्यावरच कापूस खरेदीला सुरुवात केली जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.
बळीराजा चिंतेत -
शेतकऱ्यांना पीक कर्जाची रक्कम ३१ मेपर्यंत भरायची आहे. तसेच लवकरच शेतकरी खरिपाच्या तयारीला लागणार आहे. मात्र, अद्यापही ४० टक्के शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे. कापूस विक्री होणार नाही, तोपर्यंत कर्जाची रक्कम व खरिपाच्या बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैैसेच येणार नाहीत. बाजार समित्या आता उघडल्या असल्या तरी काही दिवस बाजार समिती बंद असल्याने रब्बीचे धान्यही शेतकऱ्यांना विक्री करता आले नव्हते. त्यामुळे विविध नियम लावून का असेना कापूस खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.