जळगाव -कोरोनाची लस घेण्यासाठी विविध रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. असे असताना जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथे मात्र, एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी वशिलेबाजी करत, चक्क त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य केंद्राबाहेर रस्त्यावर कारमध्ये लस दिली. हा प्रकार काही तरुणांच्या सतर्कतेने उघड झाला. त्यानंतर लस घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरत संताप व्यक्त केला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. दरम्यान, लसीकरणाच्या प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
जळगाव तालुक्यातील कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला दररोज ११० डोस दिले जात आहेत. मात्र, या ठिकाणी दररोज ३०० हून अधिक नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. शुक्रवारी देखील सकाळपासून नागरिकांची गर्दी झाली होती. याठिकाणी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत.
नातेवाईकांना लस दिली नसल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा
शुक्रवारी सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असताना, गावाच्या बाहेर रस्त्यावर काही कर्मचारी त्यांच्या नातेवाईकांना लस देत असल्याची माहिती गावातील तरुणांना मिळाली होती. म्हणून तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याठिकाणी आरोग्य केंद्राचे कर्मचारी आढळून आले. तरुणांनी त्यांना जाब विचारला, पण ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. आम्ही केवळ नातेवाईकांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यांना लस दिली नसल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आरोग्य केंद्रातून लसीचे दोन व्हायल्स गायब?