जळगाव -ज्या लोकांनी आजपर्यंत तिरंग्याचा अपमान केला, ज्यांनी कधी तिरंगा फडकवला नाही, ते आज देशावर राज्य करत आहेत. तुमचं-आमचं बोलण्याचं स्वातंत्र्य देखील या लोकांनी हिरावून घेतले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेत्या तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर (minister yashomati thakur) यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले.
स्वातंत्र्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त 'व्यर्थ न हो बलिदान' चळवळ
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 'व्यर्थ न हो बलिदान' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशव्यापी चळवळ काँग्रेसने उभारली आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. याच अनुषंगाने आज (7 ऑगस्ट) जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
'आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा'
'तुमचा फोन याठिकाणी आहे. पेगाससमुळे आपली खडानखडा माहिती त्यांना होते. ज्यावेळी देशाच्या सीमांवर देशविघातक कारवाया होतात, त्याची माहिती व्हावी. देश सुरक्षित रहावा. शत्रूंवर वार करता यावा म्हणून पेगासस सारख्या सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. पण आज केंद्रातल्या मोदी सरकारने त्याचा दुरुपयोग करून आपल्याला संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. या देशात सुख-समृद्धी नांदावी म्हणून आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले आहे. पण आज काय परिस्थिती आहे, खरंच देशात सुख-समृद्धी आहे का? पण आज केंद्रातल्या मोदी सरकारने देश विकायला काढला आहे. असे असताना आपण गप्प बसलो आहोत. हे स्वातंत्र्य आपल्याला अखंडपणे काम करण्यासाठी मिळाले आहे, हे प्रत्यकाने लक्षात घ्यायला हवे. म्हणून तुम्हाला-आम्हाला जागे व्हावे लागणार आहे. कारण आपला करार हा काही एका व्यक्तीसोबत किंवा देशासोबत नाही तर आपला करार हा नियतीसोबत आहे. त्यामुळे आज अन्याय, अत्याचार होत असताना, संविधानाचा पावलोपावली अपमान होत असताना तुम्ही बोलत नाही. तुमचा आत्मा दुखत नाही तेव्हा नियतीच्या कराराचा भंग आपण करतोय, हे लक्षात घ्या', असे यशोमती म्हणाल्या.
'...म्हणून आली कोरोना महामारी'
'आपण नियतीशी करार केला आहे. देशाला निरोगी ठेवण्याची शपथ घेतली आहे. पण आज नियतीचा करार पाळला नाही म्हणून काय झालं असं वागलो तर कोरोनासारखी महामारी आली. कोरोना आपल्याकडे येऊ नये म्हणून राहुल गांधी ओरडून ओरडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची केंद्र सरकारला विनंती करत होते. पण त्यांच्याकडे केंद्राने दुर्लक्ष केले', असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
'हॅलो ट्रम्पमुळे अनेकांचे बळी'
''हॅलो ट्रम्प'सारखे कार्यक्रम केले. त्यामुळे कितीतरी लोक कोरोनाला बळी पडले. नितिमत्ता न पाळणारे लोक केंद्रात बसले आहेत. यांना मरकज कार्यक्रम दिसतो. पण ट्रम्प दिसत नाहीत. दुसरी लाट आली तेव्हा कुंभमेळा नाही दिसला', अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली.