जळगाव- वरिष्ठ सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवींनी आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटूंबीयांनी केला आहे. पायलला न्याय मिळण्यासाठी काँग्रेसने जळगावात गुरुवारी दुपारी निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
'पायल'ला न्याय द्या. . . जळगावात काँग्रेसचा निषेध मोर्चा
मुंबईतील नायर रुग्णालयातील पायल तडवीने रॅगींगला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी पायलला न्याय देण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
शहरातील शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा पुढे जिल्हा क्रीडा संकुल, बसस्थानक, स्वातंत्र्य चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. पायल तडवींना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या त्यांच्या वरिष्ठ सहकारी डॉ. भक्ती मेहेर, अंकिता खंडेलवाल आणि हेमा आहुजा यांना कठोर शासन करावे, पायल तडवींना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्या आईने केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नायर रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, त्याचप्रमाणे नायर रुग्णालयातील रॅगिंगविरोधी समितीच्या सदस्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.
या प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांना वाचविण्यासाठी नायर रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची नि:ष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या घटनेमुळे जातीयवाद अजूनही किती खोलवर रुजला आहे, याची प्रचिती येत आहे. दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय भविष्यात अशा वाईट घटना घडणार नाहीत, असा सूर मोर्चेकऱ्यांमधून उमटला. मोर्चा आटोपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.