जळगाव -कोरोनामुळे आपल्या आरोग्य सेवेची क्षमता लक्षात आली आहे. आरोग्य सेवा खूपच तोकडी होती. कोरोनामुळे आरोग्य सेवेतील कच्चे दुवे समजले. येत्या काळात आरोग्य क्षेत्रात मोठे आव्हान असणार आहे. आरोग्य सेवा सक्षम नसेल तर खूप आव्हान असेल. आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापूर्वी कधीही एखाद्या महामारीत एवढ्या लोकांचा मृत्यू झाला नव्हता. यापुढे आपल्याला स्वतःला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनामुळे मोठेमोठे पहिलवान घरी बसले. अनेक जण आपल्यातून निघून गेले. त्यामुळे मनाने जवळ या, शरीराने दूर रहा. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज (दि. 13 ऑक्टोबर) दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार सुभाष भामरे, रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, संजय सावकारे, चंदूलाल पटेल, सुरेश भोळे, किशोर पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जळगावच्या महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, संघटनमंत्री किशोर काळकर, जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन आदींची उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गिरीश महाजन यांचे अभिनंदन करतो. आज जगभरात ज्या आधुनिक सुविधा आरोग्य क्षेत्रात उपलब्ध आहेत. त्यातील काही महत्वाच्या सुविधा गिरीश महाजन यांनी जामनेरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी आणल्या. या रुग्णालयामुळे गोरगरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. गिरीश महाजन यांनी आमदार म्हणून चांगली कामे केली आहेत. गेल्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून उत्तम कामे केली. त्यांनी आरोग्यदूत म्हणून सर्वोत्तम काम केले आहे. गिरीश महाजन यांनी अनेक दानशूर लोकांची मदत घेऊन गोरगरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील रुग्णसेवेचे दर हे अत्यंत माफक आहेत. अनेक सरकारी योजनांचा लाभ लोकांना मिळणार आहे. खऱ्या अर्थाने लोकांना अनेक ट्रस्टच्या मदतीने आरोग्य सेवा मिळणार आहेत. ज्याच्याकडे पैसे नाहीत, अशा व्यक्तीला देखील उपचार मिळणार आहेत. याठिकाणी टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध आहे. रिलायन्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने मुंबईतून डॉक्टरांची सेवा मिळू शकणार आहे. मुंबई, पुण्यासारख्या महानगरात जी आरोग्य सेवा मिळणार नाही, ती आता याठिकाणी मिळणार आहे. कोरोनासारख्या काळात हे हॉस्पिटल उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.
जनतेच्या प्रेमातून उतराई होण्याचा माझा प्रयत्न- गिरीश महाजन