महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वेतनाच्या मागणीसाठी सफाई कर्मचाऱ्यांची महापालिकेवर धडक; 'वॉटरग्रेस' विरोधात पुकारला एल्गार - cleaning staff

वॉटरग्रेसकडे ४०० कर्मचारी साफसफाईसाठी, १२५ कर्मचारी घंटागाड्यांवर तर २५ मुकादम म्हणून कार्यरत आहेत. सर्वांचे किमान ३ ते साडेतीन महिन्यांचे वेतन रखडले आहे. किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दरमहा वेतन मिळत नसल्याने गुरुवारी सुमारे १५० ते २०० सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली.

jalgaon
वेतनाच्या मागणीसाठी सफाई कर्मचाऱ्यांची महापालिकेवर धडक

By

Published : Dec 5, 2019, 6:37 PM IST

जळगाव - करारानुसार काम करत नसल्याने शहरातील कचरा संकलनासह स्वच्छतेचा ठेका घेणाऱ्या 'वॉटरग्रेस' कंपनीच्या विरोधात प्रक्षोभ वाढत चालला आहे. गुरुवारी दुपारी सुमारे १५० ते २०० सफाई कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी महापालिका इमारतीच्या आवारात ठिय्या मांडला. थकीत वेतन देण्यासह वॉटरग्रेसचा ठेका रद्द करावा, अन्यथा शुक्रवारपासून 'काम बंद आंदोलन' छेडण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला. यामुळे जळगावात पुन्हा एकदा कचराकोंडी होण्याची शक्यता आहे.

वेतनाच्या मागणीसाठी सफाई कर्मचाऱ्यांची महापालिकेवर धडक

जळगाव शहरातील कचरा संकलनासह स्वच्छतेसाठी ५ वर्षांचा ७५ कोटी रुपयांचा ठेका नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. ऑगस्ट २०१९ पासून वॉटरग्रेसने कामाला सुरुवात केली. मात्र, सुरुवातीपासूनच करारनाम्यानुसार काम करत नसल्याने वॉटरग्रेसबाबत असंख्य तक्रारी आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे, आवश्यक ती साधने पुरवणे, गणवेश देणे असे साधे निकषही वॉटरग्रेसने पाळलेले नाहीत.

हेही वाचा - धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात 11 महिन्यात दीडशेहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

धक्कादायक बाब म्हणजे, ऑगस्ट महिन्यापासून कामाला सुरुवात झाल्यावर सफाई कर्मचाऱ्यांना एकाही महिन्याचे पूर्ण वेतन देण्या आलेले नाही. कर्मचाऱ्यांना गरजेनुसार उचल स्वरुपात काही रक्कम देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार येथे सुरू आहे. किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दरमहा वेतन मिळत नसल्याने गुरुवारी सफाई कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे सुमारे १५० ते २०० सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली.

शेकडो कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले -
वॉटरग्रेसकडे ४०० कर्मचारी साफसफाईसाठी, १२५ कर्मचारी घंटागाड्यांवर तर २५ मुकादम म्हणून कार्यरत आहेत. सर्वांचे किमान ३ ते साडेतीन महिन्यांचे वेतन रखडले आहे. वेळोवेळी मागणी करूनही थकीत वेतन मिळत नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून गुरुवारी महापालिकेच्या आवारात ठिय्या मांडण्यात आला. तर, उद्या (शुक्रवार) कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. तरीही वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर सर्व कर्मचारी वॉटरग्रेस कंपनीच्या एप्रनची जाहीर होळी करणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याची डोकेदुखी -
वॉटरग्रेस कंपनी आणि महापालिका प्रशासनात करारनाम्याच्या मुद्यावरून भांडण सुरू आहेत. या भांडणात सफाई कर्मचारी नाहक भरडले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. वॉटरग्रेसच्या करारनाम्यानुसार काम करत नसल्याने आम्ही बिल काढणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. तर, प्रशासन कामाची बिल काढत नसल्याने आम्ही कर्मचाऱ्यांना वेतन कसे द्यावे, असे वॉटरग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान, वॉटरग्रेस आणि प्रशासनातील काही अधिकारी तसेच नगरसेवकांचे लागेबांधे असून ते मलिंदा लाटत आहेत. यात कर्मचारी वेठीस धरले जात असल्याचा धक्कादायक आरोपही काही कामगार संघटनांनी केला आहे.

हेही वाचा -...म्हणून महापालिकेला सुचले कारवाईचे शहाणपण; भाजपच्या 'त्या' नगरसेवकांना नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details