महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक; बदनामीच्या भीतीने तरुणाची आत्महत्या - रावेर रेल्वेगेट

वडिलांना चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्याने वीस वर्षीय तरुणाने रेल्वे खाली आत्महत्या केली. मनोज रवींद्र प्रजापती असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

Manoj Prajapati
मृत मनोज रवींद्र प्रजापती

By

Published : Mar 6, 2020, 11:59 AM IST

Updated : Mar 6, 2020, 12:58 PM IST

जळगाव -चोरीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे घडली. मनोज रवींद्र प्रजापती (वय २०, रा. रावेर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

रावेर येथील प्रकाश सीताराम प्रजापती यांच्या घरातून ३४ हजार ५०० रुपये किमतीचे १५ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे नाणे आणि पाच हजार रोख असा एकूण ३९ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना झाली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर पोलिसांनी रवींद्र नारायण कुंभार याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. चौकशीनंतर रवींद्र कुंभारने चोरी केल्याची कबुली दिली.

हेही वाचा -साताऱ्यात बोअरवेल्सच्या ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी

या घटनेनंतर रवींद्रचा मुलगा मनोज याने बदनामीच्या भीतीने रावेर रेल्वेगेटजवळ बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

२० एप्रिलला होते लग्न -

मृत मनोजचा दर्यापूर (जि. बऱ्हाणपूर) येथील मुलीशी २० एप्रिलला विवाह होणार होता. मात्र, वडिलांना पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यामुळे समाजात बदनामी होईल, या भीतीने त्याने टोकाचे पाऊल उचलले. मनोज हा उत्कृष्ट मूर्तीकार होता.

दरम्यान, रुळांच्या बाजूला पडलेला मनोजचा मृतदेह चालत्या रेल्वेतून पाहताना कर्नाटक एक्सप्रेस (डाऊन) मधील एका प्रवाशाच्या डोक्याला लोखंडी खांबा लागून तो जखमी झाला. जखमीला उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले.

Last Updated : Mar 6, 2020, 12:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details