जळगाव- राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्षच याला जबाबदार असल्याचा आरोप करीत भारतीय जनता महिला मोर्चाकडून आज सोमवारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपाच्या खासदार रक्षा खडसे याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. हे अत्याचार कमी करण्यात सरकार कमी पडत आहे असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी केला. तसेच करोना संसर्ग रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये देखील महिला सुरक्षित नसून तेथे देखील त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचे यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी सांगीतले. यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजप महिला मोर्चाकडून अनेकवेळा करण्यात आली.
तसेच यासंदर्भात पाठपुरावा देखील सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची साधी शिष्टाई देखील दाखविली नसल्याचा आरोप भाजपा महिला मोर्चाकडून करण्यात आला. महाराष्ट्र सरकारचा प्रशासनावर अकुंश नसल्यानेच महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे झोपलेल्या या शासनाला जागे करण्यासाठीच भाजप महिला मोर्चाकडून राज्यभरात हे आक्रोश आंदोलन केले जात असल्याची माहीतीही यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
दरम्यान, यावेळी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिला अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अवघा परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात माजी मंत्री गिरिश महाजन, माजी आमदार स्मीता वाघ, महापौर भारती सोनवणे, स्थायी सभापती अड. शुचिता हाडा यांच्यासह महापालिकेच्या भाजपाच्या नगरसेविका व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.
तर, राज्यात गेल्या वर्षभरापासून महिलांवरील अत्याचारात वाढ असून अशी गंभीर परिस्थिती असुनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे माजी मंत्री गिरिश महाजन यांनी म्हणटंले. तसेच मंगळवारी जामनेर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण एकनाथ खडसे यांच्यासह सर्वपक्षिय नेते व आमदारांना दिले असल्याचेही महाजन यांनी माहिती दिली.