जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर वेगळी चूल मांडू पाहणाऱ्या जळगाव जिल्हा शिवसेनेने अखेर एक पाऊल मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या शिष्टाईमुळे भाजप-सेनेत दिलजमाई झाली आहे.
जळगाव : गिरीश महाजन यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत युती झालेली असताना जळगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गतकाळात भाजपने दिलेल्या सापत्न वागणुकीचे कारण पुढे केले होते. कार्यकर्त्यांनी जाहीर मेळावा घेऊन भाजपचे काम न करण्याचा पवित्र घेतला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी आज शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर केली. त्यामुळे सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आपण भाजपसोबत असल्याचं जाहीर केले.
सेना नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि सेनेतील मतभेद मिटल्याचे जाहीर केले. महाजन म्हणाले, की काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निश्चित आमची राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती आहे. नगरमध्ये आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेतले. परंतु, पुढच्या काळात आता आम्ही सेनेला सोबत घेणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा फॉर्म्युला असून तो जळगाव जिल्ह्यासाठीही लागू असेल, असे महाजन यांनी सांगितले.
यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगर प्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, सभागृह नेते ललित कोल्हे आदी उपस्थित होते.