जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी गिरीश महाजन आलेले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाजन यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने केलेली अटक, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत मत मांडले.
'दोषी असतील तर कारवाई झालीच पाहिजे'
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. यावर मत मांडताना गिरीश महाजन म्हणाले, की जावई कोणाचे तो विषय नाही. पण त्याठिकाणी ते खरेच दोषी असतील किंवा त्यांच्याविरोधात काही पुरावे सापडले असतील तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गंभीर गुन्हा असल्याने ती एजन्सी तपास करेल. त्यात काही तथ्य असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असे मत गिरीश महाजन यांनी मांडले.
'दुसरे कुटुंब असल्याचे मुंडेंनी केले मान्य'
धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. त्याबाबत त्यांनी स्वतः आपले दुसरे कुटुंब असल्याबाबत मान्य केले आहे. आपल्याला दोन मुले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा वेगळ्या चौकशीचा विषय आहे. याबाबत भाजपानेदेखील चौकशीची मागणी केली आहे. मुंडेंनी माहिती दडवल्याबाबत निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे. मुंडेंवर गंभीर आरोप असल्याने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.