जळगाव -राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही जनतेच्या मनातील इच्छा आहे, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी रविवारी (दि. 19 सप्टेंबर) जळगावात उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कोरोना लसीकरण महाशिबिराचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन हे रविवारी सायंकाळी जळगावात आलेले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी, शहकाटशहाचे रंगलेले राजकारण अशा विषयांवर त्यांनी मत मांडले.
आमच्यापेक्षा जनतेलाच वाटत, महाविकास आघाडी पायउतार व्हावी
गिरीश महाजन म्हणाले, राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन व्हावे, हे सरकार पायउतार व्हावे, असे आमच्यापेक्षा जनतेलाच वाटत आहे. राज्यातील जनता त्रस्त झाल्याचे आज आपण सर्वजण बघत आहोत. जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी असे सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत. आज जी वेळ राज्यावर आली आहे, ती कधीही आलेली नव्हती. अतिशय दुर्दैवी वेळ या सरकारने आणली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.