जळगाव -राज्य सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरे तसेच धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे आजपासून भाविकांना देवदर्शन करता येणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत जळगावात भाजप कार्यकर्त्यांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जनभावनेचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली.
कोरोनामुळे राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होती. त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने टप्प्याटप्प्याने प्रत्येक क्षेत्रात शिथिलता आणली जात आहे. सार्वजनिक वाहतूक, शॉपिंग मॉल, सिनेमागृहे, हॉटेल्स, अशा प्रकारच्या गोष्टींना परवानगी दिल्याने मंदिरे व धार्मिक स्थळेदेखील भाविकांसाठी उघडावीत, अशी मागणी राज्यातील संत, धार्मिक संघटना तसेच भाजपकडून सातत्याने केली जात होती. हीच मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार आजपासून सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे उघडली आहेत.
भाजपकडून हनुमान मंदिरात महाआरती -
आजपासून मंदिरे उघडल्याने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात हनुमान मंदिरात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. सर्वांनी हनुमान मंदिरात महाआरती केली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला.
हा तर जनभावनेचा विजय-
यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महापालिका स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्वीकृत नगरसेवक विशाल त्रिपाठी, मनोज भांडारकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.