जळगाव - भुसावळ ते भादलीदरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनवर ताशी १३० कि.मी. वेगात इंजिनासह दोन डब्यांची गाडी चालवून यशस्वी चाचणी घेण्यात आली. भुसावळ विभागात प्रथमच भुसावळ-भादली सेक्शनमध्ये १३० कि.मी. वेगात गाडीची चाचणी झाली. यामुळे भविष्यात या विभागातून धावणाऱ्या गाड्यांचा वेग वाढणार आहे.
भुसावळ ते जळगाव २४.१३ कि.मी. अंतरातील तिसऱ्या लाईनचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. या कामाचे मुख्य सुरक्षा आयुक्त (सीआरएस) ए. जे. जैन यांनी निरीक्षण केले. भुसावळ-भादली या १२ कि.मी. अंतरात टाकलेल्या तिसऱ्या लाईनची भुसावळपासून अधिकाऱ्यांनी चाचणी घेतली. डीआरएम आर.के. यादव यांच्यासह मुंबईतून आलेले वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. साकेगावजवळील वाघूर नदीजवळ मंडप टाकण्यात आला होता. त्या ठिकाणी मुख्य सुरक्षा आयुक्त जैन यांच्याहस्ते पूजाविधी करण्यात आला. तर डीआरएम यादव यांच्याहस्ते नारळ वाढवून निरीक्षणाला सुरुवात झाली. भुसावळ–जळगाव मार्गावरील तिसरी लाईन खुली झाल्यानंतर गाड्यांची गती वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, तसेच आऊटरला थांबणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी होईल.