महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 21, 2019, 1:48 PM IST

Updated : Sep 21, 2019, 7:43 PM IST

ETV Bharat / state

भुसावळ मतदारसंघ : युतीत जागेचा तर आघाडीत उमेदवाराचा तिढा

रेल्वेचे माहेरघर म्हणून परिचित असलेला भुसावळ विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या देखील तितकाच संवेदनशील आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.

भुसावळ मतदारसंघ

जळगाव- रेल्वेचे माहेरघर म्हणून परिचित असलेला भुसावळ विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या देखील तितकाच संवेदनशील आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. २०१४ मध्ये युती फिस्कटल्याने भाजप-सेना येथे स्वतंत्र लढली होते. त्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले संजय सावकारे विजयी झाले होते. युतीच्या फॉर्म्युल्यात ही जागा शिवसेनेकडे होती. आता जर युती झाली तर ही जागा कुणाकडे जाते? यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत. दुसरीकडे, आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. येथून तुल्यबळ उमेदवार देण्याचे आव्हान आघाडीसमोर राहणार आहेत. आपला उमेदवार देऊन वंचित बहुजन आघाडी देखील नशीब आजमावू शकते.

भुसावळ मतदारसंघ : युतीत जागेचा तर आघाडीत उमेदवाराचा तिढा

रेल्वेचे जंक्शन असल्याने भुसावळ तालुका जिल्ह्यातील प्रभावी तालुका मानला जातो. सन १९९१ च्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागा वाटपात भुसावळची जागा भाजपकडे होती. मात्र, राजाभाऊ पवार यांचा पराभव झाल्यानंतर १९९५ मध्ये भुसावळ शिवसेनेला तर जामनेर भाजपला अशी वाटणी झाली होती. सन १९९५ व १९९९ च्या निवडणुकीत भुसावळमधून शिवसेनेचे दिलीप भोळे सलग दोन वेळा निवडून आले होते. सन २००४ मध्ये राष्ट्रवादीचे संतोष चौधरी यांचा याठिकाणी विजय झाला होता. त्या काळात भुसावळ शहरासह तालुक्यात संतोष चौधरी यांची चांगली पकड होती. भुसावळ मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाच्या मतांचा प्रभाव आहे.

आरक्षणामुळे बदलली समीकरणे -
सन २००९ मध्ये मतदार फेररचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. पुनर्रचनेनंतर पूर्वीच्या मुक्ताईनगर विधानसभेतील वरणगावसह २२ गावे भुसावळला जोडली गेली. तर नशिराबादचा काही भाग तुटला. त्यावेळी तत्कालीन आमदार संतोष चौधरी यांचे स्वीय्य सहायक असलेले संजय सावकारे हे राष्ट्रवादीकडून निवडून आले. हा मोठा अनपेक्षित बदल भुसावळ मतदारसंघाने अनुभवला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले संजय सावकारे यांना पहिल्याच टर्ममध्ये जळगावच्या पालकमंत्री पदाची लॉटरी लागली होती. जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यात गुलाबराव देवकर यांना अटक झाल्यामुळे त्यांना जळगावच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या नंतर हे मंत्रिपद सावकारेंना देण्यात आले होते. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय सावकारे यांनी २०१४ मध्ये भाजपत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. यावेळी एकनाथ खडसेंच्या मदतीने सावकारे यांनी पुन्हा ही जागा जिंकली होती. आता भाजप सेनेत युती झाली तरी या मतदारसंघासाठी मित्रपक्षांत रस्सीखेच होऊ शकते. शिवसेनेचा या जागेवर दावा केला आहे. तर भाजपने विद्यमान आमदार असलेल्या जागा आमच्याकडेच राहतील, अशी भूमिका यापूर्वीच घेतल्याने युतीच्या जागा वाटपात ही जागा कुणाच्या पदरात पडते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भुसावळ विभागात भाजपत देखील मोठ्या प्रमाणावर गटबाजी असल्याने विद्यमान आमदार सावकारे यांना ती मोडीत काढण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

आघाडीसमोर तुल्यबळ उमेदवाराचे आव्हान -
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या संजय सावकारे यांनी पुन्हा विजय मिळवीत आपली आमदारकी कायम राखली. त्यावेळी देखील सावकारे यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार आघाडीला देता आला नव्हता. राष्ट्रवादीकडून अॅड. राजेश झाल्टे यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी आघाडीला तगडा उमदेवार देण्याचे आव्हान राहणार आहे. युतीच्या जागा वाटपात भुसावळच्या जागेवरून निश्चित ताणाताणी होईल, अशी परिस्थिती आहे.

पाणी प्रश्नासह उद्योग, विकासाचा मुद्दा -
भुसावळ परिसरात हतनूर व वाघूर असे दोन मोठे सिंचन प्रकल्प आहेत. तालुक्यातून तापीसारखी मोठी नदी वाहते. असे असतानाही भुसावळ शहरासह तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर आहे. भुसावळ तालुक्यातील ९० टक्के भाग ड्रायझोन असून बागायती, सिंचनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. पायाभूत सुविधा असूनही उद्योग विकासाचा अभाव, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजना, भुसावळ शहरातील असुविधा हे आताच्या निवडणुकीत प्रभावी मुद्दे ठरु शकतील.

संभाव्य उमेदवार -
भाजपकडून विद्यमान आमदार संजय सावकारे तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी प्रा. जतीन मेढे इच्छुक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे, भुसावळ नगरपालिकेतील जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, डॉ. राजेश मानवतकर, काँग्रेसच्या डॉ. सुवर्णा गाडेकर इच्छुक आहेत. शिवसेनेतर्फे प्रा. उत्तम सुरवाडे, संजय ब्राह्मणे, पंचायत समितीचे सदस्य विजय सुरवाडे, गोकुळ बाविस्कर यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत.

आघाडीच्या यशाविषयी साशंकता -
भुसावळ तालुक्यातील ९० टक्के भाग ड्रायझोन असून बागायती, सिंचनाखालील क्षेत्र अल्प आहे. एमआयडीसीचा खुंटलेला विकास, भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळण्याचा प्रलंबित प्रश्न, रोजगार, वाढती गुन्हेगारी, पायाभूत सुविधा, अशा मुद्द्यांवरून विरोधक विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात उतरतील. मात्र, खिळखिळ पक्षसंघटन असलेल्या आघाडीला कितपत यश येईल, यात शंका आहे.

२०१४ च्या विधानसभेत विजय कुणाला?
संजय सावकारे : (भाजप) ८७ हजार ८१८
अॅड. राजेश झाल्टे : (राष्ट्रवादी) ५३ हजार १८१
संजय ब्राह्मणे : (शिवसेना) ७ हजार ५९८
रामदास सावकारे : (मनसे) १ हजार १२३

लोकसभेत भाजपला ५१ हजारांचे मताधिक्य -
भाजप : ९५ हजार ३९४
राष्ट्रवादी काँग्रेस : ४४ हजार ५०६

Last Updated : Sep 21, 2019, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details