जळगाव- केळी वाहतुकीस येणारी अडचण दूर झाल्यामुळे शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यात केळी कापणीला सुरुवात झाली आहे. कापलेल्या केळीचा माल ट्रकमध्येही भरला जाऊ लागला आहे. अत्यावश्यक घटक म्हणून राज्य शासनाने केळी मालाच्या वाहतुकीस संचारबंदीतही परवानगी दिल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
राज्य शासनाच्या निर्णयामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार शिरीष चौधरी आणि चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडला होता. पालकमंत्र्यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर त्यावर तोडगा निघाला. कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये, यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अशातच माल वाहतूक ठप्प झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. देशभर लॉकडाऊन असल्यामुळे उत्तर भारतातील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्तरेकडील बाजारात नेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या शेतमालाची माती होते की काय? अशी महाभयंकर परिस्थिती केळी उत्पादक शेतकऱ्यांवर ओढावली होती.