महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 5, 2021, 10:29 PM IST

ETV Bharat / state

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात फरार अवसायकाच्या वाहन चालकाला जामीन

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात फरार अवसायकाच्यावाहन चालकाला जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणातील इतर अर्जांवर 11 तारखेला सुनावणी होणार आहे.

Bail to driver of absconding practitioner in BHR malpractice case
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात फरार अवसायकाच्या वाहन चालकाला जामीन

जळगाव -भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटीचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात अटकेत असलेला कमलाकर कोळी याला मंगळवारी पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. सुजित बाविस्कर (वाणी) याच्या अर्जाचा युक्तीवाद पूर्ण झाला असून, त्यावर ११ तारखेला निर्णय होणार आहे. जामीन मंजूर करण्यात आलेला कमलाकर कोळी हा पतसंस्थेचा फरार अवसायक जितेंद्र कंडारे याचा वाहन चालक आहे.

बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबरला जळगावात छापेमारी केल्यानंतर अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केले. सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांखला, सुजित बाविस्कर (वाणी) व कमलाकर कोळी या पाच जणांना अटक केली होती. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात मंगळवारी कोळी व बाविस्कर यांच्या जामिनावर युक्तीवाद झाला. बाविस्कर हा कंडारेचा अत्यंत विश्वासू माणूस आहे. त्याच्या घरात बीएचआरच्या संदर्भातील मूळ निविदा मिळून आल्या आहेत. या संस्थेत झालेला सर्व घोटाळा त्याला माहिती आहे. तसेच दुसरा संशयित कोळी हा कंडारेचा वाहनचालक आहे. त्याला बेपत्ता संशयितांचा ठावठिकाणा माहिती असल्याची शक्यता आहे. घोटाळ्याच्या संदर्भात होणाऱ्या बैठकींना तो हजर असायचा. त्यामुळे त्याला देखील जामीन देऊ नये, अशी हरकत सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण व ठेवीदारांच्या हजर झालेल्या त्रयस्त अर्जदार अॅड. अक्षता नायक यांनी घेतली होती. या प्रकरणात कोळी किंवा बाविस्कर यांना कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. पोलिसांनी यापूर्वीच तीन ट्रक भरुन कागदपत्र जप्त केली आहेत. त्यामुळे आता नव्याने तपास करण्यासाठी पोलिसांकडे काही शिल्लक नाही. तेव्हा अटकेतील या दोन्ही संशयितांना जामीन मंजूर करावा, असा युक्तीवाद त्यांचे वकील अॅड. उमेश रघुवंशी यांनी केला. सुमारे अडीच तास दोन्ही पक्षांनी युक्तीवाद केला. यानंतर न्यायालयाने कोळी याला जामीन मंजूर केला. तर बाविस्कर याच्या जामिनावर ११ जानेवारीला निर्णय येणार आहे.

११ तारखेला ठाकरे, सांखला व जैनच्या अर्जांवर युक्तीवाद-

या गुन्ह्यात अटकेत असलेले विवेक ठाकरे, महावीर जैन व धरम सांखला या तिघांनी देखील जामीन अर्ज दाखल केले आहेत. यातील जैन याच्या अर्जावर मंगळवारी युक्तीवाद होणार होता. मात्र, सरकारपक्षाने मुदत मागितल्यामुळे हा युक्तीवाद ११ तारखेला ठेवण्यात आला आहे. त्याच दिवशी इतर दोघांच्या अर्जावरही युक्तीवाद होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details