जळगाव -जिल्ह्यातील पारोळा शहरात घडलेल्या 20 वर्षीय तरुणीवरील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिवनंदन शालिक पवार (रा. टोळी, ता. पारोळा) यानेही विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. 9 नोव्हेंबरला पीडित तरुणीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी पारोळ्याहून धुळ्याला हलवल्यानंतर त्याने हा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या मामाने पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन तरुणांसह एका महिलेवर अपहरण, सामूहिक अत्याचारासह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने टोळी येथील रहिवासी असलेल्या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. संशयित आरोपी पप्पू पाटील याला सेंधवा येथून परत येताना शिंदखेडा येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. तर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेल्या शिवनंदन पवार याने भीतीपोटी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर धुळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पीडित तरुणीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणातील अनेक बाबींचा उलगडा होणार आहे. पोलीस तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.