जळगाव - मॉफिंग केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणासह त्याचे मित्र व कुटुंबीयांनी २२ वर्षीय तरुणीचा आठ वर्षांपासून छळ केला. अत्याचार करित तरुणीच्या हातातील अंगठ्या, सोनसाखळी आणि ५० हजार रुपये असा ऐवजही लुबाडून घेतला. अखेर या तरुणीने आठ वर्षांनंतर या घटनेला वाचा फोडली. प्रकरणी सात जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे या गुन्ह्यात दोन महिलांचा समावेश आहे.
जळगावात आठ वर्षांपासून तरूणीवर अत्याचार फोटो व्हायरल करण्याची धमकी - तरुणी १४ वर्षांची असताना भुसावळ शहरात शालेय शिक्षण घेत होती. तेव्हापासून या धक्कादायक घटनेला सुरुवात झाली. रितेश सुनील बावीस्कर हा तरुण शाळेच्या आवारात तिला भेटला. त्याने मोबाइलमध्ये तरुणीसह तिच्या मैत्रिणीचे फोटो मॉफिंग केले. हे फोटो दाखवून त्याने पहिल्यांदा तिला धमकावले. 'तुला जसे सांगेल तसे कर नाही तर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेन' अशी धमकी दिली. त्याच्या धमक्यांना तरुणी बळी पडली. त्यानंतर बंटी व राहुल नावाच्या दोन मित्रांनी तरुणीला भुसावळच्या इंजीनघाट परिसरात नेऊन अत्याचार केला. यावेळी बंटी आणि राहुल यांनी अत्याचाराचे फोटो काढले.
अत्याचारात आरोपीच्या कुटुंबीयांचाही समावेश - दरम्यान तरुणीच्या हातातील सोन्याची अंगठी काढून शाळेजवळ नेऊन सोडले. 'तू जर कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करेन' अशी धमकी रितेशने दिली. ही गोष्ट येथेच थांबली नाही तर रितेशची आई शोभा बावीस्कर आणि बहीण नंदिनी राहुल कोळी यांनीही तरुणीला धमकावले. तसेच घरातून पैसे चोरून आण, असेही तिला सांगितले. नंदिनीचे लग्न ठरले तेव्हा पुन्हा धमकी देऊन तिच्याकडून ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर तरूणीला यावल येथील कुंटणखान्यात ठेवण्याचाही प्रयत्न केला. यानंतर रितेशने तिला मुंबईला नोकरीच्या मुलाखतीच्या नावाने बोलावून घेत तिथेही अत्याचार केला.
7 जणांविरोधात गुन्हा दाखल - काही दिवसांपूर्वीच या तरुणीचे लग्न ठरण्याची वेळ आली होती. रितेशला माहिती मिळताच त्याने जळगावात येऊन तिला खान्देश सेंट्रल परिसरात घेऊन गेला. 'मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, लग्न केले नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल' अशी धमकी देत विनयभंग केला. परत जात असताना पुन्हा एकदा तिच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर या तरुणीने जळगाव शहर पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली. त्यानुसार रितेश सुनील बाविस्कर, त्याची आई शोभा सुनील बाविस्कर, बहीण नंदिनी राहुल कोळी, वडील सुनील बाविस्कर, मित्र उर्वेश पाटील, बंटी आणि राहुल या सात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.