जळगाव -जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी चोपडा तालुक्यातील धानोरा येथे बसस्थानक परिसरात असलेले इंडिकॅश बँकेचे एटीएम फोडले. सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात आली. दरम्यान, चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले असून पोलीस यंत्रणा चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहे.
धानोरा येथे इंडिकॅश बँकेचे एटीएम फोडले; चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिसांना खुले आव्हान - गुन्ह्याचा तपास
बसस्थानक परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये इंडिकॅश बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर फोडले.मात्र, सुदैवाने एटीएम मशिनचा कॅश ट्रे चोरट्यांना उघडता आला नाही. त्यामुळे मशिनमधील रोकड सुरक्षित राहिली. पोलीस यंत्रणा मात्र चोरट्यांना पकडण्यात अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धानोरा गावात अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर असलेल्या बसस्थानक परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये इंडिकॅश बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर फोडले. चोरट्यांनी सुरुवातीला एटीएम केंद्राचा मुख्य सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर आत प्रवेश करत एटीएम मशीन लोखंडी साहित्याने फोडली. मात्र, सुदैवाने एटीएम मशिनचा कॅश ट्रे चोरट्यांकडून उघडला नाही. त्यामुळे मशिनमधील रोकड सुरक्षित राहिली. रोकड लुटीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, सोमवारी सकाळी हा प्रकार उजेडात आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून कळवली. मात्र, उशिरापर्यंत पोलीस तसेच बँकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले नव्हते.
पोलीस यंत्रणेच्या कामावर प्रश्नचिन्ह
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिलेले असताना पोलीस यंत्रणा मात्र चोरट्यांना पकडण्यात अयशस्वी ठरत आहे. मागच्याच आठवड्यात भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे या गावातील एटीएम फोडून चोरट्यांनी ९ लाख रुपयांची रोकड लांबवली होती. या गुन्ह्याचा देखील अद्याप तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.