जळगाव - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची राज्य सरकारने उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे आदेश बुधवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात अपयश आल्यानेच डॉ. ढाकणे यांची उचलबांगडी झाल्याचे बोलले जात आहे.
डॉ. अविनाश ढाकणे यांची जळगावातून बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या पदस्थापनेबाबत राज्य सरकारने अद्याप स्पष्टता केलेली नाही. नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे गुरुवारी दुपारनंतर पदभार स्वीकारणार आहेत. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी त्याठिकाणी अनेक महत्त्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. आता त्यांच्यासमोर जळगाव जिल्ह्यातील विस्कटलेली प्रशासकीय घडी तसेच वाढता कोरोना संसर्ग रोखणे ही दोन प्रमुख आव्हाने असणार आहेत.