महाराष्ट्र

maharashtra

भादलीच्या 'त्या' तृतीयपंथीला न्यायालयाचा दिलासा; स्त्री राखीव प्रवर्गातून उमेदवारीला मिळाली मान्यता

By

Published : Jan 4, 2021, 12:27 PM IST

Updated : Jan 4, 2021, 5:06 PM IST

आपल्या देशात तृतीयपंथी नागरिकांनाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील अंजली पाटील या तृतीयपंथीने स्त्री प्रवर्गातून अर्ज भरला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.

Anjali Patil
अंजली पाटील

जळगाव -तालुक्यातील भादली बुद्रुक येथील अंजली पाटील (गुरू संजना जान) या तृतीयपंथीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. भादली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अंजली पाटील यांच्या स्त्री राखीव प्रवर्गातील उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्त्री राखीव प्रवर्गातील त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो छाननी प्रक्रियेत बाद ठरवला होता. यानंतर पाटील यांनी न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

भादलीच्या 'त्या' तृतीयपंथीला न्यायालयाचा दिलासा; स्त्री राखीव प्रवर्गातून उमेदवारीला मिळाली मान्यता

काय होते प्रकरण?

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील अंजली पाटील (गुरू संजना जान) या तृतीयपंथीने ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंजली पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. मतदार यादीत त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने, त्यांना महिला राखीव प्रवर्गातून उमेदवारी दाखल करता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर अंजली पाटील यांचे समाधान झाले नव्हते. त्यांनी आपली उमेदवारी वैध असून चुकीच्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज बाद केल्याचा आरोप केला होता. आपल्याकडे केंद्र सरकारने दिलेले आधार कार्ड तसेच मतदान कार्डावर तृतीयपंथी असा उल्लेख आहे. याशिवाय आपल्याकडे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र देखील असल्याने महिला राखीव प्रवर्गातून आपली उमेदवारी योग्य असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार अचूक निर्णय दिल्याचे स्पष्ट केल्याने हे प्रकरण चिघळले होते.

औरंगाबाद खंडपीठात घेतली होती धाव -

यानंतर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. अ‌ॅड. आनंद भंडारी यांनी तृतीयपंथी अंजली पाटील यांची बाजू मांडली. तृतीयपंथी व्यक्ती अधिकार संरक्षण कायदा 2019 नुसार लिंग निवडण्याचा अधिकार तृतीयपंथी व्यक्तीला आहे. याबाबीकडे अ‌ॅड. आनंद भंडारी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यानुसार खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी अंजली यांच्या बाजूने निकाल देत त्यांचा निवडणूक अर्ज स्त्री राखीव प्रवर्गातून वैध असल्याचे स्पष्ट केले.

भविष्यात पुरुष म्हणून सवलत मिळणार नाही -

खंडपीठाने अंजली पाटील यांना ग्रामपंचायत निवडणुकीत स्त्री राखीव प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मान्यता दिली आहे. उमेदवारी अर्जासंदर्भात अंजली पाटील यांच्या बाजूने खंडपीठाने निर्णय दिला खरा, परंतु, भविष्यात त्यांना पुरुष म्हणून कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. तशी सवलत मिळण्यास त्या पात्र राहणार नाहीत, असेही निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Last Updated : Jan 4, 2021, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details