जळगाव- अतिक्रमण हटाव कारवाई प्रकरणी अधिकाराचा गैरफायदा घेतल्याने अमळनेर नगरपालिकेच्या 22 नगरसेवकांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अपात्र ठरवले आहे, तर लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे.
अमळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यासह 22 नगरसेवकांना जानेवारी 2018 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी अपात्र केले होते. परंतु, नगरविकास राज्यमंत्र्यांनी अवघ्या काही दिवसात तत्कालीन जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. दरम्यान, आज विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुन्हा 22 नगरसेवकांना अपात्र केले आहे. तसेच तत्कालीन मुख्याधिकारी यांनी देखील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करून आपल्या कामात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पुन्हा एकदा अमळनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
अमळनेरचे प्रांताधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी 6 एप्रिल 2017 ला शहरातील अतिक्रमण तसेच गैरकायदा बांधकामे हटवण्यासाठी योजना तयार केली होती. त्यानुसार, गैरकायदा बांधकामे व अतिक्रमण हटवण्याचे आदेश प्रथमतः नगराध्यक्षांनी 30 मार्च 2017 व 8 एप्रिल 2017 ला दिले. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची सर्व तयारी केली होती. परंतु, अचानक 11 एप्रिल 2017 ला झालेल्या नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत गैरकायदा बांधकामे व अतिक्रमण काढण्याची मोहीम स्थगित करण्यासाठी ठराव करण्यात आला. या ठरावाला तक्रारदार तथा स्थायी समितीचे सदस्य प्रवीण पाठक यांनी लेखी विरोध केला होता. त्यानंतर 15 एप्रिल 2017 रोजी तातडीची सभा बोलवण्यात आली. त्यात मुख्याधिकारी 17 एप्रिल 2017 ला अतिक्रमण हटवणार असल्याचे ठरले. मात्र, नंतर ही कारवाई पुन्हा तहकूब करण्यात आली होती.
अतिक्रमण हटाव कारवाईचा निर्णय बदलल्यामुळे अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यासह 22 नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचे नगरपालिकेतील गटनेते प्रवीण पाठक, सविता संदानशिव, सलीम टोपी यांनी 15 जून 2017 ला जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. आमदार चौधरी गटाच्या सदस्यांनी केलेली तक्रार लक्षात घेता तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी पुष्पलता पाटील यांच्यासह 22 नगरसेवकांना अपात्र केले होते.