जळगाव - गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे कांग नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. रविवारी नदीचे पाणी थेट जामनेरातील नदीकाठच्या घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या प्रकाराबाबत माहिती देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या घराला घेराव घेतला. यावेळी महाजन यांनी भेट नाकारल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा -आमदार बच्चू कडूंनी दिव्यांगांसोबत फटाके फोडून केली दिवाळी साजरी
गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जामनेर येथे कांग नदीकाठच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाली. यामुळे अनेक रहिवाश्यांच्या संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमधील घराला घेराव घातला. यापूर्वी देखील कांग नदीच्या पुराच्या पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही पार्श्वभूमी माहिती असताना देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिक संतप्त झाले होते. दरम्यान, गिरीश महाजन यांनी भेटीसाठी आलेल्या नागरिकांना भेट नाकारल्याने त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला.