जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर येथे आज 'पाडळसे धरण झालेच पाहिजे', या मागणीसाठी पाडळसे जनआंदोलन समितीचे पदाधिकारी, शेतकरी तसेच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःला अटक करून घेत जेलभरो आंदोलन केले. 'जय जवान, जय किसान'च्या घोषणा देत आंदोलनकर्ते, शेतकरी, महिला तसेच राजकीय पदाधिकारी यांनी शेकडोंच्या संख्येने स्वतःला अटक करवून घेतली.
पाडळसे धरणाच्या मागणीसाठी अमळनेर जेलभरो आंदोलन - jalgaon
पाडळसे जनआंदोलन समितीच्या वतीने १९ फेब्रुवारी, शिवजयंतीपासून साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, या आंदोलनाची अद्याप प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या जनआंदोलन समितीच्या वतीने उपोषणाच्या १२ व्या दिवशी जेलभरो आंदोलन करण्यात आले. जनआंदोलन समितीच्या जेलभरो आंदोलनात शेकडो लोकांनी स्वतःला अटक करून घेत आंदोलन उग्र केले.
अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प हा गेल्या २० वर्षांपासून पुरेशा निधीअभावी रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण करावा, या मागणीसाठी पाडळसे जनआंदोलन समितीच्या वतीने १९ फेब्रुवारी, शिवजयंतीपासून साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, या आंदोलनाची अद्याप प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या जनआंदोलन समितीच्या वतीने उपोषणाच्या १२ व्या दिवशी जेलभरो आंदोलन करण्यात आले. जनआंदोलन समितीच्या जेलभरो आंदोलनात शेकडो लोकांनी स्वतःला अटक करून घेत आंदोलन उग्र केले. जेलभरो आंदोलनाच्या दिवशी निम्न तापी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता, तहसीलदार हे पोलीस निरीक्षकांना घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाल्याने १२ व्या दिवशी प्रशासनाला जाग आली.
आंदोलनात जेलभरो करताना पोलिसांच्या वाहनात उत्स्फूर्तपणे अटक करवून घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली. एका तासाने आंदोलकांची सुटका करण्यात आली. जनआंदोलन समितीतर्फे आंदोलन यापुढेही टप्याटप्याने सुरूच राहील, असे जाहीर करण्यात आले. येत्या ५ मार्चला कार्यकारी अभियंता, निम्न तापी प्रकल्प कार्यालयावर जनआंदोलन समिती निधीचा जाब विचारण्यासाठी धडक देणार असून ७ मार्चला पाडळसरे धरणावर जलसत्याग्रह आंदोलन करणार आहे. शासनासह प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे आंदोलन यापुढे अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.