जळगाव -वाशिम जिल्ह्यातील एका शाळेत शिपाई पदावर नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्याने वैद्यकीय रजेवर असताना तब्बल १७ दुचाकी चोरल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यातील ६ दुचाकी त्याने जळगाव शहरातून चोरल्या आहेत. या चोरट्यास मंगळवारी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाजी रामदास राठोड (५०) रा. सिव्हील लाईन, वाशिम असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
शिवाजी राठोड हा वाशिम जिल्ह्यातील एका शाळेत शिपाई पदावर नोकरीस आहे. दीड वर्षापूर्वी त्याचा अपघात झाल्यानंतर तो दीर्घ वैद्यकीय रजेवर गेला होता. यानंतर तो पुन्हा शाळेत गेलाच नाही. वैद्यकीय रजेवर असल्याच्या काळात त्याने वाशिम व जळगाव शहरातून तब्बल १७ दुचाकी चोरल्या. काही दिवसांपूर्वी वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने १७ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. १७ दुचाकींपैकी ६ दुचाकी ह्या जळगाव शहरातून चोरल्याचे त्याने सांगितले आहे. त्यानुसार मंगळवारी शहर पोलीस ठाण्याचे गणेश शिरसाळे, प्रनेश ठाकूर, निलेश पाटील, भास्कर ठाकरे यांच्या पथकाने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातून दुचाकीचोर राठोड यास ताब्यात घेतले.