जळगाव- शहरातील दाणा बाजार भागातील धान्यांच्या दुकानांवर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्याने मनपा प्रशासनाकडून ६ दुकाने सील करण्यात आली आहेत. या दुकानांचा पंचनामा करून संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या दुकानांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून शहरातील अनधिकृत हॉकर्स व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. आज मनपाचे पथक हॉकर्सवर कारवाई करण्यासाठी सुभाष चौकात आले होते. त्यादरम्यान पथकाला बाजारात झालेली गर्दी दिसून आली. त्यातच एकेरी वाहतूक सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी देखील झाली. मनपाच्या पथकाने सुरुवातीला गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर, दाणा बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. उपायुक्त संतोष वाहुळे कारवाईच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी हॉकर्सवर कारवाई केली व संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले. त्यानुसार अतिक्रमण निर्मुलन विभागाने ६ दुकाने सील केलीत.
दुकानदारांकडून विरोध
मनपाकडून ६ दुकाने सील केल्यानंतर काही दुकानदारांनी मनपाच्या पथकाला विरोध केला. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात असून काही बेजबाबदार नागरिकांमुळे आमची दुकाने सील करू नका, अशी मागणी दुकानदारांनी केली. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांनी उपायुक्तांच्या आदेशाप्रमाणे दुकाने सील करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली. अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानांबाहेर सुरक्षित अंतर पाळण्यासाठीच्या चौकटीदेखील आखल्या नव्हत्या. त्यामुळे, दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली.
प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यामुळे दुकाने सील करण्याची ही पहिलीच कारवाई