जळगाव - जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या देव्हारी गावाच्या शिवारात सुमारे पावणे नऊ लाख रुपये किंमतीचा ५०० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास भडगाव पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. शेतात असलेल्या घरात विक्रीच्या उद्देशाने हा गांजा साठवून ठेवला होता.
जळगावात ५०० किलो गांजा पकडला; दोघांना अटक तर एक फरार - देव्हारी
भडगाव तालुक्यात देव्हारी गावाच्या शिवारात ५०० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत सुमार पावणे नऊ लाख रूपये आहे. भडगाव पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
देव्हारी गावाच्या शिवारात असलेल्या एका घरात गांज्याचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याची माहिती भडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी दुपारी पोलिसांनी या घरावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी पावणे नऊ लाख रुपये किंमतीचा ५०० किलो गांजा जप्त केला. सिमेंटच्या गोण्यांमध्ये हा गांजा साठवून ठेवला होता. तसेच या कारवाईत पोलिसांनी सुनील मोहिते व संजय सरदार (रा. देव्हारी, ता. भडगाव) या दोघांना अटक केली. तर त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील मोहिते याच्यावर याआधीही गांजा तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडल्याची कारवाई झाली आहे. मोहिते व सरदार हे गांजा कोठून आणत होते, ते कोणाला विकत होते, याचा तपास पोलीस करत आहेत.