जळगाव -जिल्ह्यात आज (बुधवारी) एकाच दिवशी 31 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या आता 523 इतकी झाली आहे. जळगाव व भुसावळ शहरासह ग्रामीण भागातदेखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त नोंदीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 59 बळी गेले आहेत.
जळगाव जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल 31 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील 318 रुग्णांचे कोरोना अहवाल बुधवारी प्राप्त झाले. यातील 287 जणांचे निगेटिव्ह तर 31 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात ओंकारनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर तालुक्यातील शिरसोली गावातील 3 रुग्ण आहेत. शिरसोलीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 14 बाधित रूग्ण आढळले. त्यात जळगाव, भुसावळ, अमळनेर, यावल, एरंडोल, चाळीसगाव, नशिराबाद, पाचोरा, जामनेर, भडगाव या ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 84 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 14 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव 7, जळगाव येथील ओंकार नगर, शिरसोली येथील 3 तर यावल, भुसावळ, जामनेर, एरंडोल येथील प्रत्येकी एका व्यक्तींचा समावेश आहे. त्यापूर्वी सकाळी 16 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात भडगाव येथील 8, वडजी येथील 1, अमळनेर 3, भुसावळ 2, एरंडोल व सावदा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
रुग्ण संख्येत झपाट्याने होतेय वाढ-
जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ५९ बळी गेले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर देखील कमी होत नसल्याने जळगावकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.