जळगाव- खेळत असताना विहिरीत पडून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पारोळा शहरातील पुरातन किल्ल्यात घडली आहे. गोपाल गोविंदा मरसाळे (वय 14, रा. सुदर्शननगर, पारोळा), असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. गोपाल मरसाळे हा पारोळा शहरातील शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता.
खेळताना विहिरीत पडून शाळकरी मुलाचा मृत्यू; पारोळ्याच्या पुरातन किल्ल्यातील घटना - जळगावचा पुरातन किल्ला
विहिरीत पडून १४ वर्षीय शालेय मुलाचा मृत्य झाला आहे. जळगावच्या पारोळा शहरातील पुरातन किल्ल्यात ही घटना घडली असून गोपाल मरसाळे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
शहरातील पुरातन भुईकोट किल्ला परिसरात गोपाल मित्रांसोबत खेळण्यासाठी गेला होता. या किल्ल्यात एक विहीर आहे. पावसामुळे विहिरीच्या आजूबाजूला मोठे गवत वाढलेले आहे. गवतामुळे विहीर न दिसल्याने खेळताना गोपाल थेट विहिरीत जाऊन पडला. ही बाब त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आजूबाजूला असलेल्या लोकांना सांगितली. काही नागरिकांनी तत्काळ धाव घेत गोपालचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहीर जुनी असल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. यामुळे, गोपाल थेट गाळात फसल्याने त्याचा शोध लागला नाही.
शेवटी अथक प्रयत्न करून लोखंडी चिमट्याच्या सहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले. गोपालचे कुटुंबीय हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. या घटनेमुळे मरसाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गोपालचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.