हिंगोली - सेनगाव तालुक्यातील तपोवन येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाची गोरेगाव येथील शाळेत प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. त्यांच्या अचानक बदलीमुळे नारा़ज झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या वऱ्हांड्यात शाळा भरविली.
आम्हाला आमचे गुरुजी द्या... आवडत्या शिक्षकासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतच भरवली शाळा
आवडत्या शिक्षकाच्या अचानक बदलीमुळे नारा़ज झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या वऱ्हांड्यात शाळा भरविली होती. शिक्षकांना पून्हा शाळेवर पाठविण्याचे आश्वासन मिळेपर्यंत जेवण देखील न करण्याचा निर्णय विद्यार्थी आणि पालकांनी घेतला होता.
व्हरांड्यातच बसून विद्यार्थी अभ्यास करत असलेले पाहून जिल्हा परिषद कार्यालयात येणारे सर्वजण अचंबित झाले होते. प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकास परत शाळेवर देण्याच्या मागणीसाठी अनेकदा निवेदने दिली, मात्र त्यावर काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळेच आज पालकांनी विद्यार्थ्यासह थेट हिंगोली गाठून जिल्हा परिषद कार्यालयाच्या कक्षातच शाळा भरविली. शाळा भरविल्याने अनेक जण भारावून गेले. याची दखल घेत सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी दोन दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तेव्हाच विद्यार्थ्यांनी सोबत आणलेली शिदोरी जिल्हा परिषद परिसरात सोडून जेवण केले.