हिंगोली - रेल्वेसमोर उडी घेऊन एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना हिंगोली रेल्वे स्थानकापासून काही अतंरावर घडली आहे. यामध्ये या युवकाचा डावा पाय तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला आहे. जखमी अवस्थेत युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. किरण गणपतराव राखे (वय २२, रा. जवळा बाजार) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
किरण हा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे रुळाच्या जखमी अवस्थेत पडला होता. ही बाब लक्षात येताच पूर्णाकडून अकोलामार्गे जाणाऱ्या मालगाडी चालकाने या घटनेची माहिती हिंगोली येथील स्टेशनमास्तरला दिली. त्यानंतर प्राप्त माहितीनुसार रेल्वे सुरक्षा बलाचे एन. आर. जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाचा डावा पाय धडा वेगळा झाल्याचे आढळून आले. जोगदंड यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका संपर्क साधला.