हिंगोली- हुंड्यासाठी मारहाण करून पिंपळखुटा येथील विवाहितेला सासरच्या मंडळीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करून ते पसार झाले. ही बाब विवाहितेच्या आई-वडिलांना समजल्यावर त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन मुलीवर उपचार करवून घेतले. मात्र गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन मुलीचा मृत्यू झाल्यावर सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आई-वडिलांसह ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
हिंगोली: हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला मारल्याचा आरोप; आई-वडिलांसह ग्रामस्थांचे उपोषण - हिंगोलीत विवाहितेचा छळ
गायत्री माधव खंदारे या विवाहितेस हुंड्यासाठी मारहाण करून सासरच्या मंडळींनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करून पसार झाले. दरम्यान उपचार सुरू असताना अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्यावर सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आई-वडिलांसह ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
गायत्री माधव खंदारे असे मयत महिलेचे नाव असून तिचा पिंपळखुंटा येथील तरुणाशी 2017 मध्ये विवाह झाला होता. सुरुवातीचे एक दोन वर्षे संसार सुखात सुरू होता. गायत्रीने एका कन्यारत्नास जन्म दिला दिला आणि ती दुसऱ्यांदा गरोदर होती. मात्र मागील काही दिवसांपासून गायत्रीला सासरची मंडळी हुंड्याचे पाच लाख आणि कार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास सांगून त्रास देत होते. गायत्रीच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने सासरच्या मंडळींचा ती निमुटपणे त्रास सहन करत होती. पोटात मार लागल्याने अतिरक्तस्त्राव झाल्यावर गंभीर अवस्थेत तिला उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणावरून सासरकडील मंडळीने पळ काढला.
उपचारादरम्यान गायत्रीचा मृत्यू झाला. सेनगाव पोलीस ठाण्यात गायत्रीचे आई-वडील गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे सेनगाव पोलीसांनी सांगितले. महिना उलटूनही अजून अहवाल आला नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गायत्रीच्या आई-वडिलांसह ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.