हिंगोली -केरळ येथे एका गर्भवती हत्तीणीने अननस खाल्ल्यानंतर त्यातील स्फोटके फुटल्याने तिचा जबडा फाटून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेबाबत सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना ताजी असतानाच, हिंगोली वनविभागाकडून मिळालेल्या माहितीतून मात्र एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हिंगोलीत रानडुकरांची शिकार करण्यासाठी त्यांना विजेचा शॉक दिला जातो, अशी माहिती विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी दिली आहे.
हेही वाचा...क्रुरतेचा कळस..! गर्भवती हत्तीणीला पेटती स्फोटके खायला देऊन हत्या, केरळमधील घटना
रानडुकरांना मारण्यासाठी शिकारी वीजेचा शॉक देण्याचा अघोरी प्रकार करतात...
हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटना अतिशय कमी आहेत. वर्षभरात अवघे दोन ते तीन वनप्राणी हत्येचे गुन्हे दाखल होत असल्याचे केशव वाबळे यांनी सांगितले. हिंगोलीत सर्वाधिक शिकार ही रानडुकराची होते. या रानडुकरांना मारण्यासाठी शिकारी वीजेचा शॉक देणे, असा अघोरी प्रकार करत असल्याची माहिती देखील वनाधिकारी केशव वाबळे यांनी दिली. अशा प्रकरणात गुन्हा दाखल केला जातो आणि आरोपींना शिक्षा देखील देण्यात आली आहे किंवा दिली जाते, असेही वाबळे यांनी सांगितले.
शेतकरी आपल्या शेतीच्या रक्षणासाठी करतात शिकार...
शिकारी अथवा शेतकरी वर्ग जिल्ह्यात रानडुकरांची शिकार करत असले, तरिही ते ही शिकार वन्य प्राण्यापासून आपल्या पिकांचे रक्षण व्हावे, यासाठी करतात, असेही वनाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शेताभोवती बसवलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यास रानडुकरांचा त्याला स्पर्श झाल्यास ते मृत्यू पावतात. जंगलात सर्वत्र वनरक्षक तैनात असल्याने सध्या हिंगोलीत वन्य प्राण्यांच्या शिकारीत मोठी घट झाली असल्याचेही वनाधिकारी वाबळे यांनी सांगितले.
केरळमधील त्या हत्तीणीला मारणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी : पशुप्रेमी
केरळ येथे मानवी वस्तीत आलेल्या एका गर्भवती हत्तीणीने स्फोटके असलेले फणस खाल्ल्याने तीचा मृत्यू झाला. या हत्तीणीला तेथील स्थानिकांनी जाणूनबुजून स्फोटके असलेले अन्न दिल्याचे बोलले जात आहे. हे वृत्त समाजमाध्यमावर वाऱ्यासारखे पसरले. तसेच यावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली असून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. 'अगोदरच देशात हत्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच गर्भवती हत्तीणीला मारल्याची घटना निषेधार्ह आहे.सध्या जंगलात चारा-पाणी नसल्याने, वन्य प्राणी हे मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशा परिस्थितीत या गर्भवती हत्तीणीने देखील मानवी वस्तीकडे धाव घेतली. अशावेळी तीला माणूसकी दाखवून खायला देण्याऐवजी मारले जाते, ही घटना हृदयद्रावक आहे. मानवाने एकाच वेळी फक्त हत्तीणीचा जीव घेतला नसून तिच्या पोटात असलेल्या बाळाचा देखील बळी घेतला आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी' असे पशूप्रेमी गोपीनाथ बांगर यांनी म्हटले आहे.