हिंगोली - मालसेलू येथील जागेचा जुना वाद मिटविण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बीट जमादारास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अचानक करण्यात आलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. नंदकिशोर उत्तमराव मस्के असे बीट जमादाराचे नाव आहे.
दहा हजारांची लाच स्वीकारताना बीट जमादारास रंगेहात पकडले
अचानक करण्यात आलेल्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. नंदकिशोर उत्तमराव मस्के असे बीट जमादाराचे नाव आहे.
हिंगोली तालुक्यातील मालसेलू येथे गेल्या अनेक वर्षांपासून जागेचा वाद आहे. हा वाद न्यायालयातदेखील सुरू असून, या जागेत अजून अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारदाराने तक्रार दिली होती. त्यानुसार मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. नंतर अतिक्रमण हटवून देण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. यातील 20 हजार हे पोलीस निरीक्षकासाठी तर 5 हजार स्वतः साठी मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्याने थेट लाचलुचपत कार्यालय गाठून बीट जमादाराविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलीस अधीक्षक कल्पना बरवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पडताळणी केली. तर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज ठरलेल्या पैशापैकी पहिला 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने मालसेलू येथून काही अंतरावर असलेल्या शेत शिवारात सापळा रचून 10 हजार रुपये स्वीकारताना रंगे हात पकडले.