हिंगोली- जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून टँकरची संख्या ५३ वर जाऊन पोहोचली आहे. टँकरच्या प्रतिक्षेत बसलेले नागरिक टँकर गावात येताच विहिरीकडे सुसाट वेगाने हातात भांडे घेऊन धाव घेतात. टँकरने विहिरीत सोडलेले पाणी काही मिनिटात संपत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळते.
हिंगोली जिल्ह्यात घोटभर पाण्यासाठी नागरिकांचा जीवाशी खेळ - santosh bhise
टँकरने विहिरीत सोडलेले पाणी काही मिनिटात संपत असल्याचे चित्र हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
सध्या जिल्ह्यातील बऱ्याच गावाची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या ३९ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ३४० गावांमध्ये ४१५ विहीरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. तर ४४ गावांत नळ योजना दुरुस्तीच्या प्रस्तावास तर, 8 गावात तात्पुरत्या नळ दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे. १३९ विंधन विहिरीला (बोअर) मंजुरी मिळाली आहे. हिंगोली प्रशासन पाणीटंचाई निवारण करण्यासाठी दक्ष आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पाणीटंचाई या बाबतीत कोणत्याच अडी-अडचणी खपवून घेणार नसल्याच्या कडक सूचनाच अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
त्यानुसार अधिकारी कर्मचारी टंचाईग्रस्त गावांवर लक्ष ठेवून आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत मंजूर झालेल्या टँकरच्या फेऱ्यांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मात्र, सध्या भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. टँकरची संख्या वाढवूनही टँकरचे पाणी विहिरीत टाकले न टाकले की, काही मिनिटांत विहिर तळ गाठते. आपल्या जीवाची जराही पर्वा न करता ग्रामीण भागात विहिरीतून पाणी काढतात. जवळपास एक टँकर दहा ते पंधरा मिनिटात रिकामा होता. अजूनही टँकरची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील पाचही तालुक्यात दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या टंचाई प्राधान्य बैठकीत ग्रामसेवक, तलाठी आणि सरपंचांकडून गावातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेत, प्रशासनाला माहिती कळविण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी दिल्या. यावरूनच प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.