हिंगोली- दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी हा निसर्गासमोर हतबल झाला आहे. अशातच जून महिना संपत आला तरीही जिल्ह्यात पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे मागील 8 ते 10 दिवसापासून शहरात भाजीपाल्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात भडकल्या आहेत. तर पाऊस अजूनही लांबणीवर गेला, तर भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांकडील असलेले जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारात चढ्या दराने विक्री केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी भरत असलेल्या भाजी मंडईत भाजीपाल्याच्या भाव वाढीचे सारखेच चित्र आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक भाजीपाल्याचे भाव पाहून भाजीपाला खरेदी करणे टाळत आहेत.
आवक घटल्याने हिंगोलीमध्ये भाजीपाला महागला हिंगोली जिल्ह्यात जून महिना संपत आला तरीही पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे आजही शहरात पाण्याच्या टँकरवर जिल्ह्यातील 90 हजार लोकसंख्या अवलंबून आहे. तर अधिग्रहनाची संख्या ही 539 वर जाऊन पोहोचलीय. त्यामुळे अशा परस्थितीत भाजीपाल्याचे उत्पादन घ्यायचे कसे ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
असे आहेत भाजीपाल्याचे भाव (प्रति किलो)
- टोमॅटो- 80 ते 100
- कोथंबीर - 40 ते 50
- भेंडी- 80 ते 100
- मेथी- 80 ते 90
- गवार - 80 ते 100
- शेवगा- 100 ते 120
- वांगे- 80 ते 100 रु
- शिमला मिरची- 80 ते 100
- कारले- 100 ते 120
- चवळी- 70 ते 80
- शेपू- 30 ते 40
- पालक - 20 ते 30
- ढेम्स - 80 ते 90
- काकडी- 60 ते 80
- मिरची- 80 ते 100
- फुल कोबी- 100 ते 120
- पत्ता कोबी- 100 ते 120
- दुधी भोपळा- 70 ते 80
- बिट- 50 ते 60
- कैरी- 80 ते 90
- दोडका- 90 ते 100
- खिसा दोडके- 100 ते 120
- लिंबू - 90 ते 100