हिंगोली- आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार 6 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर नवीन 8 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध आयसोलेशल वार्ड मध्ये 75 कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. बरे होण्याच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी वाढत असल्याने हिंगोलीकरांची चिंता वाढत आहे.
संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचे प्रशासनाला प्राप्त होणाऱ्या अहवालाकडे अति बारकाईने लक्ष आहे. अशाच परिस्थितीत आज जिल्ह्याला प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 6 रुग्ण बरे झाले असून नव्याने 8 रुग्ण वाढले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा हा अजूनही 75 एवढा कायमच आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालात हटा येथील 3, वसमत 1 अन हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील 1 असे 6 रुग्ण बरे झाले आहेत. त्याना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येत असला तरी ही अजून नव्याने 8 जणांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामध्ये वसमत येथे दाखल असलेल्या 6 व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली असून, यामध्ये एका 4 महिन्यांच्या बालकाचा देखील समावेश आहे. तर हिंगोली येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आलेल्या दोघांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. यामध्ये एका 9 वर्षीय अन 12 वर्षीय बलिकेला कोरोनाची लागण झालेली आहे. या बालकांचे पालक हे मुंबई येथून हिंगोली तालुक्यात दाखल झाले होते. एकंदरीतच जिल्ह्यात 75 रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी 8, सेनगाव 12, हिंगोली 21, वसमत 11 असे रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत आयसोलेशन वाढ व जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटर मध्ये एकूण 2253 व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 1893 व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. यामध्ये 1777 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असून आज घडीला 466 व्यक्ती हे भरती आहेत तर 255 जणांचे अहवाल हे प्रयोगशाळेकडे प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.