महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीच्या कुरुंदामध्ये घरगुती गॅसचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

या स्फोटात दळवी दाम्पत्यासह त्यांची डॉक्टर मुलगी ठार झाली आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण केले होते. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

By

Published : May 3, 2019, 2:38 PM IST

घरगुती गॅसचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

हिंगोली- घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील कुरुंदा गावात घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजणाच्या सुमारास दळवी कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत असताना हा स्फोट झाला. दोनदा झालेल्या या स्फोटात दळवी दाम्पत्यासह त्यांच्या डॉक्टर मुलीचाही मृत्यू झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत दळवींचे संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण केले होते. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

घरगुती गॅसचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
सोनाजी आनंदराव दळवी (५५), सुरेखा सोनाजी दळवी(५०) आणि पूजा सोनाजी दळवी (२५) अशी मृतांची नावे आहेत. हा स्फोट एवढा भयंकर होता, की यामध्ये घरातील सर्वच वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या गेल्या. ढाब्याचे घर असल्यामुळे आतील लाकडांनी तत्काळ पेट घेतला होता. त्यामुळे ठार झालेल्या तिघांचे शरीर पुर्णतः जळून गेले होते. घटना घडताच ग्रामस्थांनी धावाधाव केली. मात्र रात्र असल्याने जळून खाक झालेले मृतदेह सापडत नव्हते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. ग्रामस्थांनी व अग्निशमन दलाच्या साह्याने आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र, दुर्दैवाने दळवी कुटुंबातील त्या तिघांना वाचविण्यात यश आले नाही.पूजा दळवी ही पुणे येथे बीएचएमएसचे शिक्षण घेते होती. दळवी कुटुंबातील नातेवाईकांचे लग्न असल्याने पूजा लग्नसोहळ्यासाठी आली होती. त्यातच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने कुरुंदा गावावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला होता आणि अचानक गॅसचा स्फोट झाला. त्यामुळे या या घटनेमागचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details