हिंगोली -लोहगाव येथील डॉक्टर श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील विद्यार्थ्यांना मागील सहा महिन्यांपासून पुरेसे भोजन दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते यांनी ही बाब उघडकीस आणली. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे
या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा काही प्रमाणात ठीक आहेत. मात्र, इतर अत्यावश्यक सुविधा अपुऱ्या असल्याने हे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी एकूण 261 विद्यार्थी आहेत. या सर्वांसाठी एकच शौचालय, आंघोळीसाठी एकच स्नानगृह आहे. पुरेसे जेवण मिळत नसल्याने मुले कधी उपाशी तर कधी अर्धपोटी राहतात. तसेच, हे सर्व विद्यार्थी जमिनीवरच झोपतात. यावरून या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागत आहे, हे स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा - गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी ऋषीकेश देवडीकरला झारखंडमधून अटक
शाळेत खेळाचे साहित्य उपलब्ध नसल्याने विद्यार्थी विविध स्पर्धांपासून वंचित राहतात. काही विद्यार्थ्यांनी डॉ. सतीश पाचपुते यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्या समोर विद्यार्थ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. त्यानुसार पाचपुते यांनी पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासन प्रयत्न करत आहे असा गवगवा केला जातो. मात्र, विद्यार्थ्यांना अशा भयंकर अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या योजना या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले. शाळेच्या परिसरात वाहत असलेल्या नालीत किडेदेखील आढळून आले. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे सतीश पाचपुते यांनी सांगितले.
सध्या संस्था चालकाच्या मुलाकडे या आश्रमशाळेचा कारभार सोपवलेला आहे. मात्र, त्याला फोन लावला असता तो विद्यार्थ्यांनाच धमकावत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
लोहगाव शाळेबाबतची कोणतीही तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही. काही लोकांकडून तोंडी माहिती मिळाली आहे. त्यानुसार सहायक प्रकल्प अधिकाऱ्याला तिथे पाठवून चौकशी केली जाईल. त्यानंतर शाळेवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सांगितले.