हिंगोली - शहरातील अण्णा भाऊ साठे नगरात 25 वर्षापूर्वी बंद पडलेल्या कत्तलखान्याच्या उभारणीसाठी सुरुवात झाली आहे. मात्र, या कारखान्यातून उत्सर्जित होणारे सांडपाणी आणि टाकाऊ मासाची योग्य विल्हेवाट न केल्याने या नगरातील महिलांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. त्यांनी या कत्तलखान्याचे काम थांबवण्याची मागणी केली. या मागणीसाठी आक्रमक झालेल्या महिलांमुळे पालिकेत गोंधळ उडाला होता.
शहरातील अण्णा भाऊ साठे नगरामध्ये विविध जाती धर्माचे 400 वर नागरिक वास्तव्यास आहेत. हा कत्तलखाना 25 वर्षांपासून बंद आहे. दरम्यान, हा कत्तलखाना सुरू होता तेव्हा या भागातून रक्ताचे लोट आणि टाकाऊ मांसामुळे दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी हा भाग सोडून दुसरीकडे आपले बस्तान मांडले आहे. मात्र, ज्यांना शक्य नाही असे नागरिक याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. दरम्यान, हा कत्तलखाना बंद असूनही परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे कत्तलखाना सुरू झाल्यास किती त्रास होईल, याची कल्पना या महिलांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिली. हा कत्तलखाना परत सुरू करू नये, या मागणीसाठी नागरिकांनी पालिकेत 'तांडव' मांडला. यामुळे नगरपालिकेत काही काळा साठी गोंधळ उडाला होता.