हिंगोली - मागील पाच महिन्यांपासून राज्य शासनाने राज्य परिवहन बंद केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित निर्णय घेण्यात आला. मात्र, आता राज्यभरात एसटी बसेस सुरू करण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. आजपासून राज्यभरात बसेस धावत आहेत. परंतु, पहिल्याच दिवशी एसटी बसेस विना प्रवासी धावत आहेत. एरव्ही एसटीची वाट बघत प्रवासी उभे असायचे, मात्र आता लालपरीलाच प्रवाशांची वाट पाहावी लागणार आहे.
सध्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एका बाकावर एक प्रवासी, अन तोंडाला मास्क-रुमाल बांधणे बंधनकारक आहे.
संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर वाढलेला असताना देखील प्रवाशांना एसटी बसने प्रवास करण्यासाठी आजपासून मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार हिंगोलीत तब्बल पाच महिन्यांनंतर बस सेवा सुरू झाली आहे. परभणी मार्गे निघालेली ही बस प्रवाशांविनाच धावली. सध्या जिल्ह्यात आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच कोरोनाची रुग्ण संख्या देखील वाढत असल्याने नागरिकांनी बसने प्रवास करणे टाळले आहे.