हिंगोली- जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रशासन पाणीटंचाई निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात ४६ च्यावर टँकरची संख्या पोहोचली असून, अजूनही पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळही पाणीटंचाई निवारणासाठी सरसावले आहे. परिवहन मंडळामार्फत हिंगोली जिल्ह्यातील हिवरा बेल दत्तक घेतले असून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.
हिंगोली जिल्हा हा पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. बर्याच गावात एका एका हंड्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 39 गावांची तर चक्क टँकरवरच तहान अवलंबून आहे. टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज असून, मागेल त्या गावाला टँकर अधिग्रहण करून पाणी टंचाईवर निवारण करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तरी देखील बरीच गावे तहानलेली आहेत. हिंगोली जिल्ह्यात या वर्षी पहिल्यांदाच एवढी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी देखील पहिल्यांदाच एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे.